मोगादिश्यू : दक्षिण सोमालियात प्रमुख बंदर असलेल्या किसमायो शहरातील एका हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात व नंतर केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक विदेशी नागरिकांसह २६ जण ठार व ५६ जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी सुरु केलेली जबाबी कारवाई १४ तासांनंतर शनिवारी सकाळी संपली. त्यात हॉटेलमध्ये घुसलेल्या चारही सशस्त्र हल्लेखोरांचा खात्मा केला गेला.सोमालियामध्ये गेली अनेक वर्षे हैदोस घालणाऱ्या ‘अल शबाब’ या इस्लामी अतिरेकी संघटनेने हा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून हल्ल्यात ‘शहीद’ झालेले आपले लढवय्ये स्वर्गात गेल्याचा दावा केला. सर्व मृतांची ओळक अद्याप पटली नसली तरी आत्तापर्यंत ज्यांची ओळख पटली आहे त्यांत केनिया व तांझानियाचे प्रत्येकी तीन, अमेरिकेचे दोन तर ब्रिटन कॅनडाचा प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. ‘अल शबाब’ ही ‘अल कायदा’शी बोधिलकी मानणारी सशस्त्र इस्लामी दहशतवादी संघटना असून सोमालियाचे सरकार उलथून टाकून इस्लामी राजवट स्थापन करण्यासाठी गेली १० वर्षे ती वारंवार अतिरेकी हल्ले करतआहे. (वृत्तसंस्था)>नेमके काय झाले?आधी एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भललेली मोटार वेगाने आणून हॉटेलच्या गेटवर आदळली. त्याच्या स्फोटामुळे जो हाहाकार माजला त्याचा फायदा घेत पोलिसांच्या गणवेशातील चार सशस्त्र दहशतवादी हॉटेलात घुसले. सुरक्षा दलांच्या कारवाईत मारले जाण्यापूर्वी त्यांनी हॉटेलच्या अनेक भागांत अंदाधुंद गोळीबार करून जो समोर येईल त्याला ठार केले. अधूनमधून अनेक स्फोटही झाले व शेवटी सुरक्षा दलांची कारवाई फत्ते होईपर्यंत हॉटेलची संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली.
सोमालियात हॉटेलवरील अतिरेकी हल्ल्यात २६ ठार, चारही दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 4:34 AM