जेरुसलेम : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १५व्या स्मृतिदिनापूर्वी इस्रायलने मंगळवारी पाकिस्तानातील ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला.
लष्कर-ए-तोयबाने २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अनेक ठिकाणी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक मारले गेले होते. त्यात काही इस्रायली नागरिकांचा समावेश होता. इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लियोर हैयात यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, होय, मी याची पुष्टी करू शकतो. तत्पूर्वी भारतातील इस्रायली दूतावासाने एक निवेदन जारी करून इस्रायलने लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केल्याचे म्हटले होते.
‘भारत सरकारने आम्हाला ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करण्याची विनंती केलेली नसताना, आम्ही स्वत:हून हे पाऊल उचलले आहे. आम्ही आमच्या दहशतवादी संघटनांच्या यादीत ‘लष्कर-ए-तोयबा’ला समाविष्ट करण्यासाठी सर्व आवश्यक नियमांचे पालन केले आहे,’ असेही या निवेदनात म्हटले आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून सागरी मार्गाने आलेल्या १० अतिरेक्यांनी अनेक ठिकाणी हल्ले केले होते. यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ लोक ठार झाले होते. (वृत्तसंस्था)