मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह पूर्ण राज्यभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 35 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. या हल्ल्यात अमेरिकेच्या सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले की, मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या हल्ल्याचे मुख्य सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, अमेरिकेकडून या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री समुद्रामार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यामध्ये 34 परदेशी नागरिकांसह 166 नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर सुमारे 700 जण जखमी झाले होते.