वॉशिंग्टन - मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला सोमवारी (26 नोव्हेंबर) 10 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यातील शहिदांना आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना अमेरिकेकडून आदरांजली वाहण्यात आली. अमेरिकेतील भारतीय दूतावासमध्ये 26/11 दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या हल्ल्यात अमेरिकेच्या सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. '26/11 हल्ल्यातील दोषींना पाकिस्ताननं शिक्षा द्यावी', अशी मागणी यावेळे अमेरिकेचे दहशतवादविरोधी अधिकारी नाथन सेल्स यांनी केली.
दहशतवादी संघटना आणि त्यांच्या नेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी सर्व देशांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. '10 वर्षापूर्वी झालेल्या या भयावह हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पापांना अद्यापपर्यंत आम्ही विसरलेलो नाहीत आणि जोपर्यंत दोषींना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही',असा इशाराही यावेळी सेल्स यांनी दिला. दरम्यान, मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 35 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे.
सेल्स पुढे असंही म्हणाले की, हल्ल्यात दोन्ही देशांचे निष्पाप नागरिक मारले गेले. दहशतवादाच्या या संकटाविरोधात आपण एकत्रित लढा दिला पाहिजे. ज्यांनी हे भ्याड कृत्य केलंय त्या दहशतवाद्यांना रोखले पाहिजे.
तर दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दहशतवादाविरोधातील लढाईत भारताच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. ट्विटरद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या दशपूर्तीनिमित्त न्यायासाठी अमेरिका भारतीयांसोबत आहे. या हल्ल्यामध्ये 6 अमेरिकन नागरिकांसोबत 166 निष्पाप लोकांचे प्राण गेले होते. आम्ही कधीही दहशतवादाला जिंकू किंवा जिंकण्याच्या जवळ जाऊ देणार नाही' असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
यावेळी शहीद हेमंत करकरे, शहीद अशोक कामटे आणि शहीद विजय साळस्कर यांच्या शौर्याला सलाम करत आदरांजलीही वाहण्यात आली.