कानो, दि. 16 - नायजेरिया पुन्हा एकदा बोको हरामच्या दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. या बॉम्बहल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 82 जण जखमी आहेत. उत्तर-पूर्व नायजेरियातील एका शिबिराच्या प्रवेशद्वारावर तीन अज्ञात हल्लेखोर महिला आल्या आणि त्यांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवला. बोको हरामच्या दहशतवाद्यांनी मंदारी शहरातील मैदुगिरीपासून 25 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या एका ठिकाणाला यावेळी लक्ष्य केलं, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी बाबा कुरा यांनी दिली आहे.पहिल्या दहशतवादी महिलेनं स्वतःला उडवून घेतल्यानंतर तिच्या पाठोपाठ इतर दोन महिलांनीही आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 82 जखमी लोकांना तातडीनं मैदुगिरीच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. पूर्वोत्तर नायजेरियात बोको हराम या दहशतवादी संघटनेनं प्रचंड उत्पाद घडवला आहे. अपहरण, गोळीबार आणि आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या प्रकारांमुळे बोको हराम या दहशतवादी संघटनेचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी बोको हराम या क्रूर दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी मैदुगिरी येथील डालोरी गावावरही दहशतवादी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात लहान मुलांसह 86 जण ठार झाले होते. अतिरेक्यांनी डालोरी गाव आणि जवळ असलेल्या 25 हजार शरणार्थींच्या दोन तळावर हल्ला केला. बोको हरामच्या तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले होते. त्यावेळी गावातील घरांना आगी लावून लहान मुलांना जिवंत जाळले होते. जवळपास चार तास मुक्तपणे या दहशतवाद्यांचा हिंसाचार सुरू होता. तेव्हासुद्धा तीन आत्मघातकी महिला हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले होते. काही जणांनी झाडाझुडपाचा आश्रय घेऊन स्वत:चा जीव वाचवला होता. मैदुगिरीमध्ये लष्करी तळ असूनही लगेच मदत मिळाली नाही अशी तक्रार या हल्ल्यातून बचावलेल्या नागरिकांनी त्यावेळी केली होती. बोको हरामने नायजेरियात आतापर्यत केलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यात 20 हजार नागरिक ठार झाले आहेत.
नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 6:51 AM