इस्लामाबाद - पाकिस्तानच्या शेखापुरा येथील रेल्वे आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये पाकिस्तानमधील शीख भाविकांची संख्या अधिक असल्याची माहिती आहे. ननकाना साहबजवळ विना फाटक क्रॉसिंग लाईनजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.
भाविकांनी भरलेल्या बसची शाह हुसैन एक्सप्रेस ट्रेनसोबत जोराची धडक झाली. यामध्ये जागेवरच 19 जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, त्यानंतर, मृतांच्या आकड्यात वाढ होऊन ती 29 पर्यंत पोहोचली आहे. शाह हुसैन एक्सप्रेस कराचीहून लाहोरकडे जात असताना दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 29 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती ईटीपीबी बोर्डाचे प्रवक्ते अमीर हाश्मी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करुन या अपघाताबद्दल माहिती देताना, दुर्घटनेची वार्ता ऐकून दु:ख झाल्याचे म्हटले आहे. तसेच, मृतांना श्रद्धांजली वाहताना, मी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे खान यांनी म्हटलंय.
दरम्यान, याप्रकरणी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी सदरील घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, अपघातास जबाबदार असलेल्या संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आहेत.