३ लाख सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश; पराभव लागला जिव्हारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 06:53 AM2022-09-22T06:53:57+5:302022-09-22T06:54:45+5:30
पुतीन यांचा निर्णय; पराभव लागला जिव्हारी
मॉस्को : युक्रेनच्या सैन्याने काही ठिकाणी रशियाच्या सैनिकांचा केलेला पराभव रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या जिव्हारी लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियातील तीन लाख राखीव सैनिकांना सज्ज राहण्याचा आदेश पुतीन यांनी दिला आहे. या सैनिकांना युक्रेनच्या सीमेवर पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. पाश्चिमात्य देशांच्या लष्करी यंत्रणेविरोधात लढा देण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
त्यांनी बुधवारी ही घोषणा केली. पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना इशारा दिला की, रशियाच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे उपाय योजणार आहोत.
युद्धाला २४ फेब्रुवारी रोजी रशियाने सुरुवात केली. हे युद्ध कधी संपणार हे अनिश्चित आहे. युक्रेनची युद्धामध्ये खूप मोठी हानी झाली आहे. मात्र त्या देशाला नाटो सदस्य देश व अन्य पाश्चिमात्य देशांनी शस्त्रास्त्रे तसेच निधीची मोठ्या प्रमाणावर मदत केली. रशियाच्या लष्कराने युक्रेनचा जो भाग काबीज केला होता, त्यांपैकी काही ठिकाणांहून युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या लष्कराला हुसकावून लावले. युक्रेनच्या लष्कराला पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या अत्याधुनिक शस्त्रांमुळे हा विजय मिळविणे शक्य झाले.
पुतीन यांची कृती लाजिरवाणी - बायडेन
युक्रेनमधील युद्धात रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यातील तरतुदींचा भंग केला आहे. ही अतिशय लाजिरवाणी कृती असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बुधवारी बायडेन यांनी भाषण केले. ते म्हणाले की, युक्रेनमधील युद्ध हे अनावश्यक आहे. पुतीन यांनी युरोपला अणुयुद्धाच्या धमक्या दिल्या आहेत.