वॉशिंग्टन: एका तीन वर्षीय मुलाने गोळी झाडून आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील शिकागो येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षीय चिमुकला घरात असलेल्या खऱ्याखुऱ्या बंदुकीसोबत खेळत होता, यादरम्यान चुकून गोळी झाडली गेली आणि त्यात त्याच्या आईचा मृत्यू झाला.
चिमुकल्याने झाडलेली गोळी महिलेच्या मानेवर लागली, यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता, रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 12 मार्चरोजी घडलेल्या घटनेला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. शहरातील एका सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली.
नेमकं काय झालं ?तीन वर्षीय चिमुकला कारच्या मागच्या बाजूला सीटवर बसला होता, तर त्याचे पालक समोर होते. यावेळी तो आपल्या वडिलांच्या खऱ्याखुऱ्या बंदुकीसोबत खेळत होता. यादरम्यान मुलाने चुकून बंदुकीचा ट्रीगर दाबला आणि गोळी त्याच्या 22 वर्षीय आई देजाह बेनेटच्या मानेच्या मागच्या बाजूस लागली. त्यानंतर महिलेच्या पतीने तिला तात्काळ शिकागो येथील रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. सध्या मुलाच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.