मॉनट्रिल : पृथ्वीची उत्पत्ती नक्की कशी झाली, पृथ्वीची निर्मिती होताना कशी उलथापालथ झालेली याबाबत अद्यापही संशोधकांची शोधमोहिम सुरू आहे. हजारो वर्षांनंतरही पृथ्वीचं हे गुढ अद्यापही कायम आहे. तसंच, हे शोध लावताना अनेक पुरातन पुरावेही हाती सापडत असतात. कुठे पार समुद्राच्या आतमध्ये शहर वसलेलं दिसतं तर, कुठे शहरांच्याखाली शहर वसलेलं आढळतं, तर कुठे प्राण्यांची, माणसांची जुनी अवशेष आढळून येतात. म्हणूनच या पृथ्वीच्या शोधापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधकांना मदत होतेय.
हे सारं इथं सांगण्यामागचं कारण असं की, कॅनडातील एका शहरात जमिनीखाली तब्बल ३० फूट खोलवर एक गुहा असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं आहे. ही गुहा जवळपास १५ हजार वर्षांपूर्वींची असल्याचं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, डेनिअल कॅनोल आणि ल्यूक ली ब्लँक या दोन संशोधकांना लंडनच्या मॉनट्रिल या शहरात एका पार्कखाली जमिनीत ३० फूट खाली एक गुहा असल्याचं आढळलं. जमिनीत ड्रिल मशिनने खोदकाम करत असताना त्यांच्या हे निदर्शनास आलं.
आणखी वाचा - प्रशांत महासागराच्या मधोमध शास्त्रज्ञांना सापडलं अज्ञात शहर
एवढ्या खोलवर गुहा असू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. एवढी वर्ष ही गोष्टी कशी लपून राहिली याबाबतीतही त्यांना आश्चर्य वाटायला लागलं. त्यामुळे त्यांनी या गुहेत जाण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या गुहेविषयी अधिक माहिती प्राप्त होईल. ही गुहा नुसतीच गुहा नसून त्यात पाणीही आढळून आलं आहे.
२०० मीटर लांब असलेल्या गुहेत जसजसं पुढे जात जाल तसतसं पाण्याची पातळी वाढत गेल्याचं डेनिअल यांनी सांगितलं. काही ठिकाणी १५ फूट खोलवर पाण्याची पातळी आढळून आली. या गुहेतल्या भिंती या चुनखडीपासून बनलेल्या होत्या.
याबाबतीत डेनिअल यांनी सांगितलं की, ‘अशाप्रकारची गुहा किंवा बोगदे केवळ चंद्रावरच सापडतात. जिथे मानवाचा वास नाही, तिथेच या गोष्टी आढळून येतात.’ तर, ल्यूक ली ब्लँक म्हणातात की, ‘असे शोध फार कमी वेळा पृथ्वीतलावर लागतात. तसंच, प्रत्येकवेळी संशोधन करताना असे पुरावे सापडतीलच असं नाही.’
संशोधकांनी या गुहेबाबतीत माहिती देताना असं सांगितलं की, ‘१५ हजार वर्षांपूर्वी ही गुहा अस्तित्वात होती. ज्यावेळी पृथ्वीतलावर हिमयुग होतं, तेव्हा या गुहेची निर्मिती झाली असावी.’काही शास्त्रज्ञांच्या मते, जमिनीखाली असलेले बोगदे किंवा गुहे शोधण्यासाठी कोणतंही तंत्रज्ञान अद्यापही अस्तित्वात नाही.
त्यामुळे अशाप्रकारे काहीतरी खोदकाम करताना काही वेगळं आढळलं की शास्त्रज्ञ तेथे जाऊन अभ्यास करतात. त्यामुळे जमिनीखालील प्राचीन गोष्टी शोधण्यासाठी तंत्रज्ञान विकसित होणं गरजेचं आहे.