इराणमधील एका कोळशाच्या खाणीत मिथेन वायूच्या गळतीमुळे भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ५१ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी याबाबत माहिती दिली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सरकारी वृत्तसंस्था आयआरएनएने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी तेहरानपासून ३३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तबास येथे कोळशाच्या खाणीत शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली, ज्यामध्ये ५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना घडली त्यावेळी खाणीत सुमारे ७० लोक काम करत होते.
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी शोक व्यक्त केला आहे. पेजेशकियन यांनी टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी मंत्र्यांशी बोललो आणि आम्ही स्फोटाचे कारण शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे."
इराणच्या कोळसा खाणींमध्ये यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. २०१३ मध्ये दोन वेगवेगळ्या खाणींमध्ये दुर्घटना झाली होती. यामध्ये ११ मजुरांचा मृत्यू झाला. यापूर्वी २००९ मध्येही अशीच एक घटना घडली ज्यात २० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. २०१७ मध्येही कोळशाच्या खाणीत स्फोट झाला होता, ज्यामध्ये किमान ४२ जणांचा मृत्यू झाला होता.