ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. 4 - सध्याचा जमाना आहे प्लास्टिक मनीचा. सरकारही सांगतंय रोखीचे व्यवहार कमी करा, डिजिटल व्यवहार जास्त करा. त्यामुळे क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स हे सध्याचे परवलीचे शब्द आहेत. या कार्डाच्या जोडीला गिफ्ट कार्ड्स, लॉयल्टी कार्ड्स, क्लब मेंबरशिप कार्ड्स, अक्सेस कार्ड्स, जिम मेंबरशिप कार्ड्स अशी वेगवेगळी कार्ड्स असतात. प्रत्येक व्यक्ती किमान पाच ते सात कार्ड्स तरी सध्याच्या युगात पाकिटात बाळगतेच. अशी अनेक कार्ड्स बाळगण्याचा त्रास कमी करणारा एक शोध अमेरिकेतील ब्रिलियंटटीएस या कंपनीने लावला आहे. त्यांनी फ्यूज कार्ड हे एक स्मार्ट कार्ड बनवलंय ज्यामध्ये 30 कार्ड्सचा डेटा राहू शकतो आणि हे एकच कार्ड बाळगलं की सगळ्या कार्ड्सचं काम होऊ शकतं.
बारकोड, ईव्हीएम चीप, मॅग्नेटिक स्ट्रीप, एनएफसी टेक यातलं काहीही असेल तर फ्यूज कार्ड ते साठवू शकतं. कार्ड स्वाइप करायचं, किंवा स्मार्टफोननं कार्डचा फोटो घ्यायचा की फ्यूज कार्ड कार्डमध्ये असलेली माहिती गोळा करतं. विशेष म्हणजे, फ्यूज कार्ड हे स्मार्टफोनवरील अॅपशी लिंक केलेलं आहे. त्यामुळे फ्यूज कार्ड हरवलं तरी त्यामधील माहिती भलत्याच्या हाती पडण्याचा धोका नाहीये. कारण, या अॅपच्या सहाय्याने फ्यूज कार्डमध्ये नोंदली गेलेली सगळी माहिती तुम्ही एका झटक्यात डिलीट करू शकता.
अत्यंत पातळ म्हणजे 0.03 मिलीमिटर जाड असलेलं फ्यूज कार्ड तुम्हाला कुठलंही कार्ड अॅड करायची सुविधा देतं. सिलेक्शन मेन्यूमध्ये फक्त स्क्रोल करायचं आणि नवीन कार्ड अॅड करायचं. फ्यूज कार्ड बॅटरीवर चालतं, परंतु एकदा चार्ज केल्यावर एक महिना त्याची बॅटरी चालते. शिवाय त्याच्याबरोबर पॉवर बँकही येते त्यामुळे एक्स्ट्रा चार्ज सोबत असतो.
ब्रिलियंटटीएसचे सीईओ जेहन बे यांच्या सांगण्यानुसारलहानात लहान आकारात गॅजेट्सची निर्मिती करणं हे आव्हान असून त्यांच्यासाठी हा प्रवास 17 वर्षांपूर्वी सुरू झाला. फ्यूज कार्ड ही या क्षेत्रातली क्रांती असल्याचा दावा बे यांनी केला आहे.