Israel-Hamas : गेल्या अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन/हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगभरात दोन गट पडले असून, एक गट इस्रायलला तर दुसरा पॅलेस्टाईन/हमासला पाठिंबा देत आहे. आता याचे पडसाद थेट अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल हजारो आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निषेधार्थ शनिवारी(8 जून) व्हाईट हाऊसला घेराव घातला.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघटना हमास यांच्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात युद्धाला सुरुवात झाली. यानंतर सातत्याने दोन्ही बाजून हल्ले सुरू आहेत. यात आतापर्यंत हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. या युद्धामुळे इस्रायलवर जगभरातून टीका होत आहे. अशातच इस्रायलला पाठिंबा दिल्यामुळे हजारो पॅलेस्टाईन समर्थकांनी व्हाईट हाऊससमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी दोन मैल लांब लाल रंगाचे बॅनर पकडून व्हाईट हाऊसला घेराव घातला. या बॅनरद्वारे 'रेड लाईन'चा संदर्भ देण्यात आला होता.
बॅनरवर मृतांची नावे लिहिली या बॅनर रिलीजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या दोन मैल लांबीच्या बॅनरमध्ये 7 ऑक्टोबरपासून इस्रायलच्या हल्ल्यात मृत पावलेल्या 40,000 हून अधिक पॅलेस्टिनींची यादी आहे. ट्विटरवर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात आंदोलक व्हाईट हाऊसच्या आत स्मोक बॉम्ब फेकताना दिसत आहेत.