बोगोटा : कोलंबिया सरकार ३१५ वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या स्पॅनिश नौदलाच्या जहाजाचे अवशेष बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. काही वर्षांपूर्वी कोलंबियाच्या नौदलाने एका जहाजात रोबोटच्या मदतीने मोठा खजिना शोधून काढला होता.
यामध्ये सोने, चांदी आणि मौल्यवान रत्नांचा समावेश आहे. त्यांची किंमत तब्बल १७ अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. कोलंबियातील कार्टाजेनाच्या किनाऱ्याजवळ याचे अवशेष सापडले होते. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी प्रशासनाला गॅलन सॅन जोस नावाच्या जहाजासह पाण्यातून बुडालेला खजिना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.
कोलंबियाचे सांस्कृतिक मंत्री जुआन डेव्हिड कोरिया म्हणाले की, अध्यक्ष पेट्रो यांना २०२६ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी जहाज जमिनीवर आणायचे आहे. कोलंबियाने २०१७ मध्ये ३,१०० फूट खोल समुद्रात रिमाेटने चालणारे यंत्र पाठविले होते. यंत्राने जहाजाच्या घेतलेल्या फोटोंमध्ये विखुरलेले सोन्याचे तुकडे, तोफ आणि चिनी मातीचे कप दिसले. तोफ, तलवारी आणि भांडी चमकताना दिसत होती.
आणखी दोन देशांचा खजिन्यावर दावाआणखी दोन देशांनी या खजिन्यावर दावा केला आहे. हा खजिना कोणाचा यावरून स्पेन, बोलिव्हिया आणि कोलंबिया यांच्यात वाद आहे. स्पेनचा दावा आहे की हा त्यांचा खजिना आहे, कारण जहाज त्यांचे आहे. बोलिव्हिया म्हणते की ते त्यांच्या मालकीचे आहे, कारण त्यांना स्पेनने धातूंचे खणण करण्यास भाग पाडले होते.
लुटण्याचा प्रयत्न, ६०० सैनिकांचा मृत्यू- १७०८ मध्ये ब्रिटिश सैन्याने स्पेनवर हल्ला केला. त्यावेळी स्पॅनिश राज्यांतून गोळा केलेला खजिना जहाजांतून नेला जात होता.- सॅन जोस हे जहाजही त्याच्यात होते. त्यावर एक कोटीहून अधिक सोन्याची नाणी, मौल्यवान रत्ने होती. - ब्रिटिश जहाजांनी कॅरिबियन समुद्रात ते घेरण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला होता, यात ते बुडाले होते. - बुडाल्यामुळे जहाजावरील ६०० सैनिक, क्रू मेंबर्स यात मारले गेले.