मनिला, दि. 16 - फिलीपाईन्समध्ये फक्त 24 तासात 32 ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आलं आहे. ड्रग्जविरोधात छेडण्यात आलेल्या कारवाईचा भाग म्हणून या ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी अंडरकव्हर ऑपरेशन आखलं होतं. एकूण 66 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ग्राहक बनून ड्रग्ज खरेदी करण्याची 'बाय बर्स्ट' योजना आखली होती अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे.
काहीठिकाणी हे ऑपरेशन सुरु असताना ड्रग्ज माफिया आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. 20 ठिकाणी 'बाय बर्स्ट' ऑपरेशनदरम्यान तर 14 ठिकाणी शोधमोहिमेदरम्यान चकमक उडाली असल्याची माहिती अधिका-याने दिली आहे. या चकमकीत एकूण 32 ड्रग्ज माफियांना ठार करण्यात आलं.
फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुर्तेते यांनी ड्रग्ज व ड्रग्ज माफियाच्या विरोधात छेडलेल्या युद्धामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. जून 2016 मध्ये रॉड्रिगो यांनी फिलीपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर आतापर्यंत 9000 हून अधिक ड्रग्ज माफियांना मारून टाकण्यात आलं आहे.
मंगळवारी फिलीपाईन्समध्ये ड्रग्ज माफियांविरोधात करण्यात आलेली कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून एका रात्रीत इतक्या जणांना ठार करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. 32 जणांना ठार करण्यात आलं असून 107 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर अनेकांनी त्यांची हत्या करणं गरजेचं होतं का असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र पोलिसांनी परिस्थितीनुसार आम्ही कारवाई केली असं सांगितलं आहे.
फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुर्तेते यांनी ड्रग्ज माफियांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी भूमिका घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्यांना दिसता क्षणीच गोळ्या मारण्याचे आदेश देण्यात आला आहे. रॉड्रिगो यांनी 30 जून, 2016 रोजी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतली आहेत. वर्षाच्या आत देशातून ड्रग्जचे नामोनिशान मिटवून टाकेन अशी शपथच त्यांनी घेतली होती. धक्कादायक म्हणजे सामान्य नागरिकांनाही ड्रग्ज माफियांना मारण्याचे आदेश दिले आहेत.