ढाका : बांगलादेशमध्ये शुक्रवारी पहाटे एक धक्कादायक दुर्घटना घडली. येथील एका फेरीला लागलेल्या आगीत 32 जणांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या फेरीला आग लागली, त्यावेळी फेरीत जवळपास 1000 लोक होते, असे सांगण्यात येत आहे. राजधानीपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या झलकोटी जिल्ह्यात ही घटना घडली. फेरीला आग लागल्याने काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी नदीमध्ये उड्या मारल्या, मात्र, यावेळी त्यांचा देखील मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक पोलीस प्रमुख मोइनुल इस्लाम यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, "ओबिजान 10 या तीन मजली फेरीला नदीच्या मध्यभागी आग लागली. आतापर्यंत 32 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जळालेले लोक पाहून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आगीत भाजल्याने बहुतांश लोकांचा मृत्यू झाला. तर काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या, यामुळे त्यांचा मृत्यू झाला."
रिपोर्टनुसार, प्राथमिक तपासात ही आग फेरीच्या इंजिनमध्ये लागल्याचे आढळून आले आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या बचावकार्य सुरू आहे, असेही स्थानिक पोलीस प्रमुख मोइनुल इस्लाम यांनी सांगितले. दरम्यान, याआधी जुलैमध्ये ढाका येथील एका 6 मजली कारखान्यात आग लागली होती. या अपघातात 52 जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास 30 जण जखमी झाले होते. कारखान्याच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली होती.