ऑनलाइन लोकमत
बिश्केक, दि. 16 - किर्गिस्तानमधील निवासी परिसरामध्ये तुर्की एअरलाईन्सचे कार्गो विमान कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान हाँगकाँगहून इस्तंबूलच्या दिशेनं जात होते. मिळालेल्या माहितीनुसार तुर्की एअरलाइन्सच्या या विमानाचा अपघात मानस आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावरच झाला.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता ही दुर्घटना घडली. मानस आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होण्याआधीच या विमानाला अपघात झाला. निवास परिसरात अपघात झाल्याने जवळपास 15 इमारतींचे नुकसान झाले आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, विमानातील कर्मचा-यांच्या संख्येचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही, मात्र यात एकही प्रवासी नसल्याचे वृत्त आहे.
सध्या युद्धपातळीवर घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. दाट धुक्यांमुळे विमानाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Kyrgyzstan says at least 32 dead after Turkish cargo plane hits houses: AFP— ANI (@ANI_news) 16 January 2017