वॉशिंग्टन : झपाट्याने वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे जगात दरवर्षी ३३ लाख नागरिकांचा मृत्यू होतो. ही तर धोक्याची घंटा आहे. जर यावर नियंत्रण मिळविले नाही, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची ही संख्या दुप्पट होऊ शकते, असा इशारा अध्ययन करणाऱ्या वैज्ञानिकांनी दिला आहे.जर्मनी, सौदी अरेबिया आणि हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी हे निष्कर्ष काढले आहेत. प्रामुख्याने कृषी व औद्योगिकीकरण अधिक असलेल्या देशात धुरामुळे व कारखान्यातील वायू प्रदूषणामुळे हा धोका वाढत असल्याचे या अध्ययनात म्हटले आहे. वायू प्रदूषणावर जर नियंत्रण मिळविता आले नाही, तर २०५० पर्यंत वायू प्रदूषणाच्या बळींची संख्या दुप्पट होऊ शकते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्रीचे अभ्यासक जोस लिलायवेल्ड यांनी यासंदर्भातील एका पत्रिकेत प्रकाशित लेखात म्हटले आहे की, तीन महिन्यांत झालेले हृदयविकाराचे, स्ट्रोकचे मृत्यू याचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.युनिव्हर्सिटी आॅफ नॉर्थ कॅरोलिनाच्या पर्यावरण विभागाचे प्रोफेसर जेसन वेस्ट यांनी म्हटले आहे की, जगभरात विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यात सहा टक्के मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होतात, असे दिसून आले आहे. (वृत्तसंस्था)
प्रदूषणामुळे जगात दरवर्षी ३३ लाख नागरिकांचा मृत्यू
By admin | Published: September 18, 2015 3:06 AM