कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये डाईव्ह बोटीला भीषण आग लागली. यामध्ये 33 जण बेपत्ता झाले असून पाच जणांना वाचविण्यात यश आल्याचे अमेरिकेच्या तटरक्षक दलाने सांगितले.
दक्षिण कॅलिफोर्नियाच्या सांता क्रूज बेटाजवळ आज पहाटे (अमेरिकन वेळ) ही दुर्घटना घडली. आगीनंतर बोट 20 यार्ड पाण्यामध्ये बुडाली. ही बोट स्कुबा डायव्हिंगसाठी वापरली जात होती. या बोटीचे नाव कन्सेप्शन असे होते. 75 फुटांच्या बोटीवर जवळपास 38 लोक होते. ही बोट शनिवारपासून स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेली होती, असे सांता बार्बरा टूर ऑपरेटरकडून सांगण्यात आले.
या बोटीमध्ये सहा कर्मचारी आणि 32 प्रवासी होते. यापैकी पाच जणांना वाचविण्यात यश आले असले तरीही यातील प्रवासी किती हे स्पष्ट झालेले नाही. तर न्यूयॉर्क टाईम्सनुसार 34 जण बेपत्ता झाले आहेत. तटरक्षक दलाला संकटात असलेल्याचा संदेश प्राप्त झाला. यानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. बोटीला आग लागल्याने अनेकांनी जीव वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. तटरक्षक दलाने लगेचच हेलिकॉप्टर आणि दोन स्पीड बोटी आग विझविण्यासाठी पाठवून दिल्या. मात्र, घटनास्थळावर दाट धुके असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते.