काबूल : अफगाणिस्तानात मुसळधार पावसामुळे आलेल्या मोठ्या पुरात गेल्या तीन दिवसांत किमान ३३ जणांचा मृत्यू झाला असून, २७ जण जखमी झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे तालिबान प्रवक्ते अब्दुल्ला जनान सॅक यांनी रविवारी सांगितले की, अचानक आलेल्या पुरामुळे राजधानी काबूल आणि देशभरातील इतर अनेक प्रांत प्रभावित झाले आहेत. सुमारे २०० जनावरे दगावली आहेत.
तसेच, सुमारे ८०० हेक्टर शेतजमीन आणि ८५ किलोमीटर (५३ मैल) पेक्षा जास्त रस्त्यांचे पुरामुळे नुकसान झाले आहे. पश्चिम फराह, हेरात, दक्षिणी झाबुल आणि कंदाहार या प्रांतात सर्वाधिक नुकसान झाले. अफगाणिस्तानच्या ३४ पैकी बहुतांश प्रांतांमध्ये आणखी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.