वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅनहॅटन न्यायालयात ३४ आरोप निश्चित करण्यात आले. त्यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे देणे आणि निवडणूक प्रचारादरम्यान बिझनेस रेकॉर्डमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध फौजदारी खटला दाखल होत आहे.
ट्रम्प यांनी न्यायालयात स्वत: ला निर्दोष असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिका नरकात जात आहे. मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांच्या जामीन किंवा अटकेवर निर्णय दिला नाही. पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार आहे.
कुटुंबाने वाऱ्यावर सोडले?
ट्रम्प यांनी कोर्टात हजेरी लावल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्नी मेलानिया त्यांच्यासोबत नव्हती. इतकेच नाही तर माजी राष्ट्राध्यक्षांची सल्लागार असलेली मुलगी आणि जावईही एकत्र नव्हते. मुलगी इवांका आणि जावई जेरार्ड कुशनर सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेत. एवढ्या मोठ्या प्रकरणाचा सामना करत असताना ट्रम्प यांना कुटुंबाने एकटे सोडले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ट्रम्प प्रकरणात ५ महत्त्वाच्या तारखा
- ९ मे पर्यंत आरोपांशी संबंधित पुरावे सादर करता येतील
- ८ जूनपर्यंत ट्रम्प आपल्या बचावासाठी पुरावे देऊ शकतात
- ८ ऑगस्टपर्यंत ट्रम्प यांची टीम खटला फेटाळण्यासाठी याचिका दाखल करू शकते.
- १९ सप्टेंबरपर्यंत विरोधी पक्ष खटला फेटाळण्यासाठी ट्रम्प यांच्या याचिकेवर युक्तिवाद करेल.
- ४ डिसेंबर रोजी न्यायाधीश मर्चेन सर्व याचिकांवर निकाल देतील. ट्रम्प या दिवशी न्यायालयात हजर होतील.
आरोप काय?
ट्रम्प यांच्यावर व्यावसायिक रेकॉर्ड खोटे केल्याच्या प्रकरणात ३४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला शांत राहण्यासाठी १ लाख ३० हजार डॉलर्स देण्याशी संबंधित आहेत.चेकवर स्वाक्षरी करण्याशी संबंधित ११ गुन्हे आहेत. आणखी ११ आरोप कोहेनच्या कंपनीला सादर केलेल्या खोट्या पावत्यांशी संबंधित आहेत आणि उर्वरित १२ हे रेकॉर्डमधील खोट्या माहितीशी संबंधित आहेत.
न्यायाधीश म्हणाले... कायदा सर्वांना समान
- ट्रम्प प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या मॅनहॅटन जिल्हा ॲटर्नी अल्विन ब्रॅग म्हणाले की, आम्ही गंभीर गुन्ह्याला सामान्य करू शकत नाही. मग पुढे तुम्ही असाल किंवा अन्य कोणी. तुमच्यावर कारवाई केली जाईल. कायद्यापुढे सर्व समान आहेत, याची आम्ही खात्री करू.
- पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला शांत राहण्यासाठी १ लाख ३० हजार डॉलर्स देण्यामुळे ट्रम्प आता पुरते अडकले आहेत.
ट्रम्प २०२४ ची निवडणूक लढवू शकतात?
कोर्टात प्रकरण सुरू असताना ट्रम्प आरामात निवडणूक लढवू शकतात. जर ते या प्रकरणांमध्ये दोषी आढळले तरीही त्यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही बंदी नसेल. दोषी आढळल्यानंतर शिक्षा पूर्ण होईपर्यंत ते फ्लोरिडातून मतदान करू शकत नाहीत.