ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 24 - पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने गेल्या 27 जानेवारीला पकडलेल्या एकूण 350 भारतीय मच्छिमारांना येथील न्यायलयाने दोषी ठरविले असून त्यांची पुन्हा भारतात रवानगी करण्याचा आदेश बुधवारी दिला.
जानेवारी महिन्यात 27 तारखेला पाकिस्तानच्या हद्दीत शिरून मासेमारी केल्याच्या आरोपावरून या सर्व भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने अटक केली होती. त्यांनतर त्या सर्वांना मालिर येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते.
दरम्यान, सर्व मच्छिमारांवर आरोप निश्चित करण्यासाठी येथील न्याय दंडाधिकारी सलमान अमजद सिद्दिकी यांनी तुरुंगात येऊन न्यायालय भरविले. यावेळी या सर्व मच्छिमारांनी न्याय दंडाधिका-यांसमोर आपला गुन्हा कबुल केला, असता सर्वांना दोषी ठरविले. तसेच, न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपींनी आतापर्यंत भोगली तेवढी शिक्षा भरपूर झाली असे सांगून सर्व मच्छिमारांची रवानगी भारतात करण्याचा आदेश पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाला दिला आहे.