कैरो : इस्रायली लष्कराने दक्षिण गाझा पट्टीत केलेल्या अनेक हल्ल्यांत ३६ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
जखमींवर उपचार सुरू असलेल्या कैरोमधील नासेर हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, मृतांमध्ये एका कुटुंबातील ११ जणांचा समावेश आहे. त्यात २ मुलेही आहेत. गाझातील खान युनिस शहरात सकाळी इस्रायलच्या हवाई हल्ल्यांत त्यांच्या घरावर बॉम्ब पडला. आणखी दोन हल्ले खान युनिसमधील रस्त्यावरील प्रवासी वाहनावर झाले. एका हल्ल्यात १७, तर दुसऱ्या हल्ल्यात ५ प्रवासी ठार झाले. नासेर हॉस्पिटलमध्ये ३३ मृतदेह आणले गेले आहेत. खान युनिसमधील ३ स्वतंत्र हल्ल्यात हे लोक ठार झाले. शहरातील अल-अक्सा मार्टर्स हॉस्पिटलमध्येही ३ मृतदेह आणण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमास आणि अन्य संघटनांच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर अचानक हल्ला केल्यानंतर गाझामधील युद्धाला तोंड फुटले होते.
शस्त्रसंधीसाठी बोलणी
दरम्यान, इस्रायल व हमास यांच्यात शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी अमेरिका, इजिप्त आणि कतार यांनी पुढाकार घेतला असून, रविवारी कैरो येथे उच्चस्तरीय बैठक होत आहे. त्याआधी शनिवारी तज्ज्ञांची एक बैठक पार पडली.
हमासचे एक पथक शनिवारी कैरोत दाखल झाले. हमास चर्चेत थेट सहभागी होणार नाही. इजिप्त व कतारकडून हमासला वाटाघाटींची माहिती देण्यात येईल.