जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर तुमच्यासमोर अनेक धनाढ्य व्यक्तींची नावं येतील. पण थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न ज्यांना राजा राम एस्क या नावानेही ओळखले जाते. त्यांच्याकडे एवढी अमाप संपत्ती आहे, जी पाहून बड्या बड्या उद्योगपतींचेही डोळे दिपू शकतात. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीच्या आकडेवारीचीही कुणी कल्पना करू शकत नाही. हिरे-दागदागिने, मौल्यवान वस्तू आणि इतर संपत्तीच्या प्रचंड संग्रह असलेल्या या राजांचा समावेश जगातील सर्वात धनाढ्य व्यक्तींमध्ये होतो. फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार थायलंडचे राजे असलेल्या महा वजिरालोंगकोर्न यांच्याकडे एकूण ४० अब्ज डॉलर (तब्बल ३ लाख कोटी रुपये) आहे. या संपत्तीमुळे त्यांचा समावेश हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये आणि सर्वात श्रीमंत शाही व्यक्तींमध्ये होतो.
थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. त्यामध्ये ६ हजार ५६० हेक्टर (१६ हजार २१० एकर) जमीन आहे. त्यामध्ये अनेक सरकारी वास्तू, मॉल, हॉटेल आणि अन्य संस्थांचा समावेश आहे. त्याशिवाय सियाम कमर्शियल बँकेमध्ये २३ टक्के भागीदारी आणि सियाम सिमेंट समुहामध्ये ३३.३ टक्के भागीदारीसह राजा महा वजिरालोंगकोर्न यांची थायलंडच्या वित्तिय आणि ओद्योगिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी आहे.
तसेच इतर मौल्यवान खजिन्यामध्ये ५४५.६७ कॅरेटचा ब्राऊन गोल्डन जुबिली हिरा आहे. तो जगातील सर्वात मोठा आणि महागडा हिरा आहे. त्याची किंमत तब्बल ९८ कोटी रुपये आहे. तसेच राजा महा वजिरालोंगकोर्न यांच्याकडे हेलिकॉप्टर, बोईंग, एअरबस आणि सुखोई सुपरजेटसह ३८ विमानांचा ताफा आहे. त्यांच्या इंधनासाठी आणि देखभालीसाठी दरवर्षी तब्बल ५२४ कोटी रुपयांचा खर्च होतो.
त्याबरोबरच राजा महा वजिरालोंगकोर्न यांच्याकडे शेकडो आलिशान कार आहेत. त्यामध्ये लिमोसिन, मर्सिडिज बेंझसह ३०० कारचा समावेश आहे. एवढंच नाही तर त्यांच्याकडे सोन्याचं नक्षीकाम केलेल्या ५२ सोनेरी नौकाही आहेत. राजाचा महाला २३,५१,००० चौकिमी क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. मात्र ते तिथे राहत नाहीत. हे ठिकाण त्यांनी सरकारी कार्यालये आणि संग्रहालयांना समर्पित केले आहे.