पॅरिस, दि. 8 - फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला.
या निवडणुकील माक्रोन यांना सुमारे 80 लाख 50 हजार 245 म्हणजेच एकूण मतदानापैकी 61.3 टक्के मते मिळाली आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांना 50 लाख 89 हजार 894 म्हणजे एकूण मतदानाच्या 38.7 टक्के मते मिळाली आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशाचे भावी राष्ट्रपती म्हणून माक्रोन यांचे नाव चर्चेत होते. अखेर अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्ष निवडणुकीतही माक्रोन यांनी बाजी मारली.
माझ्या विजयाने ही फ्रान्सचा समृद्ध इतिहासामधील एका नवा अध्यायाची सुरुवात होत आहे. हा विजय एक आशा आणि विश्वास बनावा, अशी अपेक्षा मॅक्रॉन यांनी विजयानंतर व्यक्त केली. माजी बँकर असलेल्या माक्रोन यांचा जन्म उत्तर फ्रान्समध्ये 21 डिसेंबर 1977 रोजी झाला होता. माजी बँकर असलेल्या माक्रोन यांना 2012 साली तात्कालीन राष्ट्रपती ओलांद यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच 2014 साली त्यांनी फ्रान्स सरकारमध्ये वित्त मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. 2016 च्या अखेरीस फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते.