सिडनी : तडे गेल्यामुळे जगभरात बोइंगची ५० विमाने उड्डाणे बंद करून जमिनीवर (ग्राउंडेड) आणण्यात आली आहेत. बोइंग कंपनीने अधिकृतरीत्या हे मान्य केल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे.
यावर बोइंगची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. कंटास एअरवेज व साऊथवेस्ट एअरलाइन्स या कंपन्यांनी आपल्या ताफ्यातील बोइंग ७३७ एनजी विमानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानांत काही समस्या निर्माण झाल्या आहेत. तातडीने तपासणी करावी अशा स्वरूपाच्या या समस्या नसल्या तरी या विमानांच्या साट्याला तडे गेल्याच्या घटना जगभरात उघडकीस आल्यानंतर या कंपन्यांनी विमानांची संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय घेतला. बोइंग ७३७ एनजी या विमानाच्या ‘पिकल फोर्क’ नावाच्या भागात समस्या असल्याचे बोइंगने याआधी मान्य केले आहे. विमानाचे पंख साट्याला जोडण्याचे काम हा भाग करतो. अमेरिकेच्या हवाई नियमकाने या जातीच्या सर्व विमानांची तपासणी करण्याचे आदेश त्यानंतर दिले होते.
बोइंगला गुरुवारी नव्या सुरक्षाविषयक चिंतांचा सामना करावा लागला. जगभर केलेल्या तपासणीत ७३७ एनजी जातीच्या ५० विमानांत तडे आढळल्याचे कंपनीने मान्य केले आहे. बोइंग कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डेनीस म्युलेन्बर्ग अमेरिकी सिनेटच्या वाणिज्य, विज्ञान व वाहतूकविषयक समितीसमोर हजर झाले.