चत्तनुगा : इस्लामिक स्टेटने (आयएस) रमझान महिन्यात हिंसक कारवाया वाढतील असा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील टेनेसी येथील चित्तनुगा येथे गुरुवारी बंदूकधाऱ्याने लष्कराच्या दोन कार्यालयांवर केलेल्या गोळीबारात चार खलाशी ठार तर तीन जण जखमी झाले. हा हल्लेखोर नंतर पोलीस गोळीबारात ठार झाला. हा हल्ला स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणे अकरा सुरू होऊन अर्ध्या तासाने संपला.फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशनने (एफबीआय) या संशयित हल्लेखोराचे नाव मोहम्मद युसुफ अब्दुलअझीज (२४) असे सांगितले असले तरी या हत्याकांडाच्या हेतूबद्दल लगेचच काही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, असे म्हटले. स्थानिक दहशतवादाचा हा क्रूर हल्ला असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. ओपन टॉप फोर्ड मुस्तांग कार चालवत अब्दुलअझीझ आला व लष्कराच्या भरती केंद्रात जाऊन त्याने गोळीबार सुरू केला. नंतर तो १० किलोमीटरवरील नॅव्हल रिझर्व्ह सेंटरवर गेला व त्याने चार खलाशांना गोळ््या घालून ठार मारले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो मरण पावला. अब्दुलअझीझ हा जन्माने कुवेती पण अमेरिकन नागरिक होता. एसआयटीई या गुप्तचर गटाने म्हटले आहे की, अब्दुलअझीझ याने सोमवारी ब्लॉगवर म्हटले होते की ‘आयुष्य हे छोटे व कटू आहे’ आणि मुस्लिमांनी ‘अल्लाला शरण जाण्याची’ संधी सोडता कामा नये. अब्दुलअझीझच्या वडिलांची त्यांचे विदेशी दहशतवादी संघटनेशी काही संबंध होते का या संशयावरून अनेक वर्षे चौकशी सुरू होती. चौकशीत त्यांच्या मुलाबद्दल काहीही माहिती न मिळाल्यामुळे त्यांना नंतर सोडून देण्यात आले होते. (वृत्तसंस्था)