जिनिव्हा : सिरियातून शेजारी देशात पळून गेलेल्या नागरिकांची संख्या आता ४० लाखांच्या वर पोहोचली असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या यूएनसीएचआर संघटनेने जाहीर केले आहे. २०१५ च्या अखेरपर्यंत निर्वासितांची संख्या ४० लाख २७ हजारांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. एका देशातील युद्धामुळे पळून गेलेल्या निर्वासितांची ही सर्वोच्च संख्या असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सिरियातील नागरिकांना मदतीची गरज आहे, हे नागरिक सध्या अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत असे संयुक्त राष्ट्राचे निर्वासित उच्चायुक्त अँटानिओ ग्युटेरा यांनी म्हटले आहे. सिरियातील निर्वासित लेबनॉन, जॉर्डन, इराक, तुर्कस्तान व इजिप्तमध्ये असून, तुर्कस्तानात सर्वात जास्त म्हणजे १८ लाख सिरियन निर्वासित राहत आहेत. २ लाख ७० हजार निर्वासितांनी युरोपमध्ये आश्रय मागितला आहे. ७६ लाखांपेक्षा जास्त लोक सिरियात विस्थापित झाले आहेत. सिरियातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून युरोपकडे लोकांची पावले वळत आहेत; पण अजूनही बहुतांश लोक याच भागात राहत आहेत, असे ग्युटेरा यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
सिरियातून ४० लाख निर्वासितांचे पलायन
By admin | Published: July 10, 2015 1:35 AM