'पॉर्न हब' या पॉर्नोग्राफिक वेबसाईटविरोधात सध्या वातावरण तापलं आहे. नुकतंच या वेबसाईटवरुन लाखो व्हिडिओ हटविण्यात आले होते. अप्लवयीन आणि सेक्स ट्राफिकिंगच्या बळी ठरलेल्या मुलींचे व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप 'पॉर्न हब' या वेबसाइटवर करण्यात आला आहे.
सेक्स ट्राफिकिंगच्या बळी ठरलेल्या महिलांपैकी ४० महिला आता 'पॉर्न हब' या कॅनेडियन कंपनीविरोधात खटला दाखल करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, 'पॉर्नहब' वेबसाइटची मूळ कंपनी 'माइंडगीक' विरोधात ४० मिलियन डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे. अनेकदा विनंती आणि अर्ज करुनही वेबसाइटवरील अल्पवयीन आणि सेक्स ट्राफिकिंगच्या बळी ठरलेल्या मुलींचे व्हिडिओ हटविण्यात 'पॉर्नहब'ला अपयश आले आहे.
सेक्स ट्राफिकिंगविरोधात २०१९ साली एफबीआयच्या साथीने केल्या गेलेल्या कारवाई दरम्यान 'गर्ल डू पॉर्न' या टोळीतील म्होरक्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या मुलींचे व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवरुन हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही 'पॉर्नहब'वर यासंबंधीचे व्हिडिओ अद्याप ऑनलाइन पाहता येत असल्यानं गहजब उडाला आहे.
नेमका खटला काय?'पॉर्नहब'ची मूळ कंपनी 'माइंडगीक' कंपनीला मुली आणि महिलांना खोटं बोलून जाळ्यात ओढणाऱ्या 'गर्ल्स डू पॉर्न' या टोळीबाबतची संपूर्ण माहिती होती. चुकीच्या पद्धतीने आमच्याशी खोटं बोलून अश्लिल चित्रिकरण करुन ते व्हिडिओ पॉर्नहब वेबसाइटवर अपलोड केले गेल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे.
पीडित महिलांनी अनेकदा तक्रार करुनही २०१६ पासून ते व्हिडिओ पॉर्नहबने आतापर्यंत हटवलेले नाहीत. गैरवर्तन करुन संबंधित व्हिडिओ काढले गेल्याचं सिद्ध झाल्यानंतरही पॉर्नहबने व्हिडिओ मागे घेतलेले नाहीत, असा आरोप पीडित महिलांनी केला आहे.
२०१९ साली सोशल मीडियावर पीडित महिलांनी याबाबत उघडपणे बोलण्यास सुरुवात करुनही 'पॉर्न हब'ने त्याकडे दुर्लक्ष केले. लैंगिक तस्करीचे सबळ पुरावे असूनही 'माइंडगीक' कंपनीने चौकशीस नकार दिला आणि पीडितांना मदत देखील केली नाही, असा आरोप महिलांनी दाखल केलेल्या खटल्यात करण्यात आला आहे.
नुकसान कसं भरुन काढणार?तक्रार केलेल्या पीडित महिलांना त्यांचे व्हिडिओ वेबसाइटवरुन हटवले जातील असं आश्वासन दिलं गेलं होतं. पण ते व्हिडिओ हटवले गेलेले नाहीत. त्यामुळे पीडित महिलांची प्रतिमा मलीन झाल्याचं खटल्यात नमूद करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या कोर्टाने 'पॉर्नहब'ला झापल्यानंतर कंपनीने संबंधित व्हिडिओ मागे घेतल्याचा दावा कोर्टात केला होता. पण 'पॉर्नहब'च्या वेबसाइटवर अजूनही ते व्हिडिओ पाहता येत असल्याचं पीडितांचं म्हणणं आहे.