१९९५ मधील शिरकाण...
ऑनलाइन लोकमत
हेग (बोस्निया), दि. २५ - माजी बोस्नियन सर्ब नेता रॅडोवॅन कॅरॅड्झिकला सेब्रेनिका येथे झालेल्या हत्याकांडासाठी तसेच इतर नऊ युद्ध गुन्ह्यांसाठी दोषी ठरवत संयुक्त राष्ट्राच्या न्यायाधीशांनी ४० वर्षांचा कारावास ठोठावला आहे. युगोस्लाव युद्ध गुन्हे लवादाने कॅरॅड्झिकला १९९२-९५ या काळामध्ये झालेल्या बाल्कन युद्धातील विविध अत्याचारांसाठी दोषी ठरविले होते. या युद्धात एक लाख लोकांनी प्राण गमावले होते तर १९९५ साली सेब्रेनिका येथे झालेल्या शिरकाणामधये ८००० मुस्लिमांनी प्राण गमावले होते. हे हत्याकांड दुस-या महायुद्धानंतर झालेले सर्वात क्रूर आणि वाईट हत्याकांड समजले जाते.
एकेकाळी बोस्नियन सर्ब रिपब्लिकच्या संरक्षणदलाचा प्रमुख असणा-या कॅरॅड्झिकने आपण केलेले कृत्य शांततेसाठी केले होते, आपण कौतुक आणि आदरास पात्र आहोत शिक्षेसाठी नाही असे वक्तव्य शिक्षा सुनावण्यात येण्यापूर्वी केले होते. कॅरॅड्झिकला आठ वर्षांपूर्वी पकडण्यात आले, तत्पूर्वी तो अनेक वर्षे परागंदा होता. या खटल्यामध्ये कॅरॅड्झिकनेच स्वत:ची बाजू मांडली.
संताप कायम
सेब्रेनिका हत्याकांडासाठी दोषी असणा-या कॅरॅड्झिकला माफ करणे बोस्नियन नागरिकांना अत्यंत कठीण जाणार आहे. त्यांच्या मते ही शिक्षा अत्यंत कमी असून, शिक्षा होण्यासाठी खूपच उशीर झाला आहे. खटल्याची आठ वर्षे कॅरॅड्झिक तुरुंगातच असल्याने ही आठ वर्षेदेखील शिक्षेमध्ये गृहित धरली जातील आणि दशकभरानंतर तो पॅरोलवर सुटेल अशी चिंता काही बोस्नियन नागरिकांनी व्यक्त केली आहे.