Canada Vs India: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हत्येवरून गेल्या काही दिवसांपासून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध तणावग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी भारतानेकॅनडाला अल्टिमेटम देत ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सांगितले होते. यासाठी १० ऑक्टोबरची तारीख देण्यात आली होती. मात्र, यावरून आता कॅनडाचा चांगलाच तिळपापड झाला असून, गेल्या ४० ते ५० जगातील कोणताही देश भारतासारखा वागला नाही, असे कॅनडाने म्हटले आहे.
कॅनडाचे माजी राजनैतिक अधिकारी यांनी भारताच्या अल्टिमेटमबाबत प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. गेल्या ४० किंवा ५० वर्षात अशी कोणतीही घटना घडल्याचे मला आठवत नाही. भारताकडून अशा प्रकारे अधिकाऱ्यांना माघारी पाठवणे सामान्य गोष्ट नाही, असे कॅनडाच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारतातील कॅनडाच्या राजनैतिकांची संख्या कमी करण्याची निश्चित तारीख १० ऑक्टोबर होती. पण कॅनडाने भारतासोबत खाजगी चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ही चर्चा निष्फळ ठरली.
भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, भारताने २० ऑक्टोबरनंतर २१ कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना सोडून इतर सर्वांचे विशेषाधिकार समाप्त करण्याबाबत माहिती दिली आहे. कॅनडाचे भारतात असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करता, आम्ही भारतातून ते सुरक्षित परततील ही बाब सुनिश्चित करत आहोत.
दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत भारतावर गंभीर आरोप केले होते, परंतु कॅनडा पोलिसांनी मात्र निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताच्या सहभागाबाबतच्या निष्कर्षप्रत पोहोचलो नसल्याचे म्हटले आहे. आम्ही निज्जर हत्येबाबत गँगवॉरच्या दृष्टीनेही तपास करत आहोत. तूर्तास हत्येच्या कारणांबाबत स्पष्टपणे काहीही सांगू शकत नाही, असे म्हटले. त्यामुळे पोलिसांच्या या वक्तव्यानंतर मात्र दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.