ऑनलाइन टीम
तिकरित, दि.१७- इराकमध्ये तिकरित शहरावर दहशतवाद्यांनी कब्जा केला असून या शहरात भारतातून गेलेल्या ४४ परिचारिका अडकल्या आहेत. या परिचारकांना दररोज शीळे अन्न दिले जात असून आम्हाला आता आम्ही जीवंत राहू याची शक्यता कमीच वाटते अशी भिती या परिचारका व्यक्त करत आहेत. परराष्ट्र मंत्रायलानेही या घटनेची दखल घेत परिचारकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु केले आहेत.
इराकमधील तिकरित शहरात इराकी बंडखोर दहशतवाद्यांनी ताबा मिळवला आहे. या शहरातील रुग्णालयात भारतातील ४४ तरुणी परिचारिका म्हणून कार्य करतात. यातील बहुसंख्य तरुणी या केरळमधील आहेत. रुग्णालयातील काही परिचारिकांशी इराकमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. 'दहशतवाद्यांनी रुग्णालयावरही ताबा मिळवला असून आम्हाला जेवणात शीळे अन्न दिले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्हाला एकाच वॉर्डमध्ये डांबून ठेवण्यात आले आहे. सशस्त्र दहशतवादी आमच्यावर नजर ठेवून असतात' असे एका तरुणीने सांगितले. या सर्व तरुणींना सुरक्षितरित्या इराकमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी या तरुणींच्या कुटुंबीयांनी केली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी या संपूर्ण घटनेकडे आम्ही गांभीर्याने बघत असून संयुक्त राष्ट्र आणि रेड क्रॉस या जागतिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. दरम्यान, इराकमध्ये राहणा-या भारतीयांनी भारतीय दुतावासाच्या संपर्कात राहावे असे आवाहन परराष्ट्र खात्याने केले आहे.