इस्लामाबाद : भारताने बनविलेल्या कोविशिल्ड लसीचे ४.५ कोटी डोस पाकिस्तानला गावी या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत मिळणार आहेत. गरीब देशांना लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी गावी संस्था काम करते. सार्क सदस्य देशांपैकी एकट्या पाकिस्तानने भारताकडून कोरोना लस मागविली नव्हती. या साथीमुळे निर्माण होणारी सामुदायिक प्रतिकारशक्ती तसेच इतर देशांकडून मदत स्वरूपात मिळणाऱ्या कोरोना लसी यांच्या पाठबळावर या संसर्गाशी मुकाबला करण्याचे पाकिस्तानने ठरविले होते. चीनच्या सिनोफार्म या कंपनीतर्फे कोरोना लसीचे १० लाख डोस पाकिस्तानला देण्यात येणार आहेत. अॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या तसेच भारतात उत्पादित झालेली कोविशिल्ड स्वीकारण्यास पाकिस्तानने अद्याप तरी नकार दिलेला नाही.
पाकिस्तान स्वीकारणार भारताची लस कोरोना लसी देण्याबाबत पाकिस्तानने चीनलाच साकडे घातले होते. भारताकडून लस घेणार नाही असा आडमुठेपणा दाखविला होता. मात्र गावीसारखी संस्था व परिस्थितीच्या रेट्यामुळे पाकिस्तान खळखळ न करता आता भारतात बनलेली लस स्वीकारणार आहे.