न्यूयॉर्क : पर्यावरणाची हानी होत असताना पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता पूर्णपणे बर्फाच्छादित अंटार्क्टिकातील बर्फाच्या स्तराखाली तब्बल ४६० किलोमीटर लांबीची हिमनदी वाहत असल्याचे पुरावे संशोधकांना सापडल्याने चिंतेत भर पडली आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फ वितळण्याचे प्रमाण
अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. अंटार्क्टिकातील बर्फाच्या चादरीखाली काय घडामोडी घडत आहेत, याचा अभ्यास संशोधक अनेक दशकांपासून करत आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीत संशोधकांनी अंटार्क्टिकामधील तलावांना जोडणाऱ्या पाण्याच्या सखल वाहिन्यांचे चित्र रंगवण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, संशोधक प्रथमच अंटार्क्टिकाखालील बर्फाच्या नदीचे थेट सर्वेक्षण करू शकले. बर्फाच्या चादरीवर छिद्र करून खाली एका अरुंद प्रवाहाची झलक त्यांना मिळाली.
बर्फाखाली नद्यांचे जाळे‘जेव्हा आम्हाला काही दशकांपूर्वी अंटार्क्टिका बर्फाच्या खाली सरोवरांचा शोध लागला, तेव्हा आम्हाला वाटले की ते एकमेकांपासून वेगळे आहेत. परंतु आता आम्हाला समजू लागले आहे की तेथे बर्फाखाली नद्यांचे जाळेच आहे आणि त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत,’ असे लंडनमधील इम्पिरियल कॉलेजचे संशोधक प्रो. मार्टिन सिगर्ट म्हणाले.
वेगवान प्रवाहामुळे वितळण्याचे प्रमाणही वाढले...सिगर्ट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बर्फाच्या स्तराखाली हायड्रोलॉजी आणि एअरबोर्न रडार सर्वेक्षणाच्या माध्यमातून ४६० किलोमीटरची नदी उघडकीस आणली आहे. त्यांना दिसून आले की ही नदी बर्फाच्या स्तराखालून मार्ग काढत समुद्राला मिळते.
...तर अंदाज लावणे शक्य उपग्रहाच्या मोजमापांवरून आम्हाला अंटार्क्टिकाच्या कोणत्या प्रदेशात बर्फ कमी होत आहे हे माहीत आहे; असे का होत आहे, हे सांगणे अवघड असल्याचे वॉटर्लू विद्यापीठातील अभ्यासक डॉ. क्रिस्टीन डो यांनी सांगितले.