वॉशिंग्टन - अमेरिकेमधील कोलोराडामधील न्यायालयाने एका व्यक्तीला 472 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 31 वर्षीय ब्रॉक फेंकलिनला लहान मुलं आणि महिलांची फसवणूक करुन देहव्यापारात ओढल्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रॉक फेंकलिनला आपलं संपुर्ण आयुष्य आता कारागृहात घालवावं लागणार आहे. ब्रॉक फेंकलिन हा एकटा नव्हता, तर त्याची एक टोळीच होती. हे सर्वजण मिळून लहान मुलं आणि महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम करत असे. ब्रॉक फेंकलिनने फेसबूकच्या माध्यमातून अनेक महिला आणि तरुणींचा भरती केली होती. ब्रॉक फेंकलिन मानवी तस्करी, लैंगिक शोषण, बाल वेश्याव्यवसाय आणि अपहरणासहित 30 प्रकरणांमध्ये दोषी आढळला आहे. फिर्यादी पक्षाने न्यायालयाने दिलेल्या शिक्षेचं समर्थन करताना सांगितलं आहे की, हा एक प्रकारचा संदेश आहे. जर कोणी अशा प्रकारचा गुन्हा करत असेल तर त्याच्याविरोधात इतकीच कठोर कारवाई करण्यात येईल असा संदेश यामुळे लोकांपर्यंत पोहोचला आहे.
'देशात अशाप्रकारचा गुन्हा केल्यास सहन केला जाणार नाही असा संदेश न्यायालयाच्या निर्णयामुळे मिळाला आहे. मानवी तस्करीसाठी अमेरिकेच्या इतिहासात इतकी कठोर शिक्षा आजपर्यंत देण्यात आलेली नाही', असं कोलोराडे अॅटर्नी जनरल कार्यालय प्रवक्ता जेनेट ड्रेक यांनी सांगितलं आहे.
ब्रॉक फेंकलिन फेसबूकच्या माध्यमातून महिला आणि तरुणींची भरती करत होता. त्यांना अंमली पदार्थांचं व्यसन लावलं जायचं आणि नंतर मग त्यांचा सौदा केला जात असे. एका पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, आपल्यासोबत काय काय झालं हे शब्दांत सांगू शकत नाही इतकं भयानक आहे. ब्रॉक फेंकलिनच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कारागृहामागे गेला पाहिजे अशी इच्छाही तिने व्यक्त केली आहे.
ब्रॉक फेंकलिनच्या टोळीत एकूण सातजण होते, ज्यामधील चौघांना आधीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेत गेल्या एक दशकात 22 हजाराहून जास्त मानवी तस्करीची प्रकरणं नोंद झाली आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, जगभरात चार कोटींहून जास्त लोक मानवी तस्करी पीडित आहेत. यामधील 40 लाख लोकांना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आलं.