दुबई : कोरोना साथीमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय भारताने घेतल्यापासून १९ भारतीय नागरिक तीन आठवडे दुबईविमानतळावरच अडकून पडले. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय चाचणीत आढळून आल्यानंतर त्यांना दुबई विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये हलविण्यात आले. अन्य देशाच्या विमानांना भारतात येण्यास बंदी लागू झाल्यानंतर, अडकलेल्या १९ भारतीयांनी पहिले काही दिवस दुबई विमानतळावरील बाकड्यांवर बसून घालविले. त्यानंतर त्यांची २१ मार्चला कोरोनाविषयक वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
या साथीची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाल्याने २५ मार्चपासून त्यांना दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हॉटेलमध्ये पाठविण्यात आले. तेव्हापासून ते अद्याप तिथेच राहात आहेत. या भारतीय नागरिकांपैकी अरुण सिंह (३७ वर्षे) हे पहाटे चारच्या विमानाने दुबईहून अहमदाबादला परतणार होते. त्या रात्री विमानतळावर आल्यावर ते एके ठिकाणी बसले होते. तिथे त्यांना गाढ झोप लागली व त्यांचे विमान चुकले. या प्रकाराची आता अरुण सिंह यांना हळहळ वाटत आहे. विमान चुकल्याच्या दिवसापासूून ते दुबईतच अडकून पडले आहेत. हॉटेलमध्ये जेवणे व पुन्हा खोलीत येऊन झोपणे याशिवाय आम्हाला सध्या दुसरा उद्योग उरलेला नाही असे त्यांनी सांगितले. यूएइ बँकेमध्ये ते आयटी तज्ज्ञ म्हणून काम करतात.