तेल अवीव - हिजबुल्लाहवर भीषण हल्ल्यानंतर इस्त्रायलनं देशात इमरजेंसी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देशात स्पेशल होम फ्रंट सिच्युएशनची घोषणा आहे. ही स्थिती देशातील सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता असते तेव्हा दिली जाते. इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर अली कराकी ठार मारला गेला मात्र अधिकृतपणे त्याची पुष्टी झाली नाही.
याआधी सोमवारी इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्याने हिजबुल्लाह जवानांमध्ये हाहाकार माजला. दक्षिणी लेबनानमध्ये इस्त्रायलद्वारे केलेल्या हल्ल्यात ४९२ लोक मारली गेली तर १०२४ लोक जखमी आहेत. २१ मुले, ३९ महिलांसह जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि डॉक्टरांचा समावेश आहे. लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या जवळपास ३०० ठिकणांवर एकाचवेळी बॉम्ब डागले गेले. लेबनानमध्ये तातडीने लोकांना त्यांची घरे आणि इमारती सोडण्याचा इशारा देण्यात आला.
लेबनानी अधिकाऱ्यांनुसार, त्यांच्या देशाला ८० हजाराहून अधिक संशयास्पद इस्त्रायली कॉल आलेत. त्यात लोकांना घरं खाली करण्यास सांगितले आहे. दूरसंचार कंपनी ओगेरोचे प्रमुख इमाद क्रेदेह यांनी याची पुष्टी करत हे कॉल म्हणजे विनाश आणि अराजकता निर्माण करण्यासाठी मानसिक युद्धासारखे आहे. इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका व्हिडिओतून लेबनानच्या नागरिकांना संदेश दिला आहे.
मानवी ढाल म्हणून तुमचा वापर होतोय...
मी लेबनानच्या लोकांना सांगू इच्छितो की, इस्त्रायलची लढाई तुमच्याशी नाही. आम्ही हिजबुल्लाहशी लढत आहोत जे दिर्घकाळापासून तुम्हाला मानवी ढाल म्हणून वापरत आहेत. ते तुमच्या लिविंग रुममध्ये रॉकेट, गॅरेजमध्ये मिसाईल ठेवत आहेत. त्यातून ते आमच्या देशातील नागरिकांवर हल्ले करतायेत. त्यामुळे आमच्या सुरक्षेसाठी आता हे शस्त्र नष्ट करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हिजबुल्लाहपासून दूर राहा. आपापल्या सुरक्षित ठिकाणी जा असं आवाहन इस्त्रायली पंतप्रधानांनी लेबनानच्या नागरिकांना केले आहे.
दरम्यान, इस्त्रायली आणि लेबनान यांच्यात १३० किमी सीमा लागते. हा इस्त्रायलच्या उत्तरेकडे आणि लेबनानच्या दक्षिणेकडील भाग आहे. त्याला ब्लू लाईन नावाने ओळखले जाते परंतु लेबनानच्या जमिनीवर पसरलेल्या आणि वाढलेल्या हिजबुल्लाहकडून वारंवार इस्त्रायलला धोका निर्माण होतो. सैन्य ताकदीवर लेबनान इस्त्रायलसमोर टिकू शकत नाही. ग्लोबल रॅकिंगमध्ये १४५ देशांमध्ये इस्त्रायलचा नंबर १८ तर लेबनान १११ व्या नंबरवर आहे. दोन्ही देशाची तुलना होऊ शकत नाही