कीव्ह : युद्ध सुरू झाल्यापासून दुसऱ्या देशांमध्ये पलायन केलेल्या युक्रेन निर्वासितांची संख्या आता ५० लाखांवर पोहोचली आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेने (युएनएचआरसी) दिली. मारियुपोल शहरावर संपूर्ण कब्जा मिळविण्यासाठी रशियाने बुधवारी आणखी जोरदार हल्ले चढविले. या शहरात अडकलेल्या युक्रेनच्या हजारो नागरिकांना तिथून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न जारी आहेत.
युएनएचआरसीने म्हटले आहे की, युक्रेनच्या शेजारी देशांपैकी एकट्या पोलंडने सर्वाधिक २८ लाख निर्वासितांना आश्रय दिला आहे. त्यानंतर रोमानिया, हंगेरी, मोल्दोवा, स्लोवाकिया, बेलारूस या देशांतही युक्रेन निर्वासित गेले आहेत. आपणही साडेतीन लाख युक्रेन निर्वासितांना आश्रय दिल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनच्या निर्वासितांची आकडेवारी ३० मार्च रोजी ४० लाख होती. गेल्या वीस दिवसांत त्यामध्ये १० लाखांची भर पडली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्वासितांची समस्या युक्रेन युद्धाच्या निमित्ताने आता उभी राहिली आहे.
रशियाने कीव्ह परिसरातून सैन्य माघारी घेऊन ते पूर्व युक्रेनच्या दिशेने वळविले आहे. मारियुपोल या शहरावर संपूर्ण कब्जा करण्यासाठी रशियाने या शहरावरील हल्ले वाढविले आहेत. त्याचबरोबर डोनबास येथील वेढाही अधिक घट्ट केला आहे. मारियुपोल येथील स्टील प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी त्यावर रशियाने आणखी बॉम्बचा वर्षाव केला. या स्टील प्रकल्पाच्या अडोशाने मारियुपोलमध्ये युक्रेनचे सैनिक लढत आहेत. त्यांचा पूर्ण नि:पात करण्यासाठी रशियाने हल्ल्यांचे प्रमाण वाढविले आहे.
२ लाख देशोधडीलामारियुपोलमध्ये अडकलेल्यांपैकी महिला, मुले व वयोवृद्ध लोकांना सुखरूप जागी हलविण्यासाठी कॉरिडोर खुले करण्याबाबत युक्रेनने रशियाशी प्राथमिक स्वरूपाचा करार केला होता. पण आता कोणताच करार रशिया पाळण्याची तयारी दाखवत नसल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. मारियुपोलमधून याआधी २ लाख लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. युद्ध सुरू होण्याआधी या शहराची लोकसंख्या ४ लाख होती.