वॉशिंग्टन : मुंबईवर बारा वर्षांपूर्वी, २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण हल्ल्याच्या कटाचा मास्टरमाइंड व लष्कर- ए-तय्यबाचा दहशतवादी साजीद मीर याला पकडण्यासाठी खात्रीलायक माहिती देणाऱ्यास अमेरिकेने ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले. यासंदर्भात अमेरिकेने एका निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या लष्कर- ए- तय्यबाच्या १० प्रशिक्षित दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने भारतात घुसखोरी केली.
त्यांनी मुंबईत येऊन ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, लिओपोड कॅफे, नरिमन (छबड) हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अशा विविध ठिकाणी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेल्या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते. या हल्लेखोरांपैकी फक्त अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. अजमल याला ११ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. मुंबईवरील हल्ल्याची आखणी व अंमलबजावणीची जबाबदारी लष्कर- ए- तय्यबाने साजीद मीरकडे सोपविली होती. (वृत्तसंस्था)
मीरवर अमेरिकेत खटलामुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याप्रकरणी अमेरिकेत सुरू असलेल्या एका खटल्यात साजीद मीर हा आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. लष्कर-ए- तय्यबा ही दहशतवादी संघटना असल्याचे अमेरिकेने डिसेंबर २००१ मध्ये जाहीर केले होते.