ऑनलाइन लोकमतकिन्शासा, दि. 20 - मध्य आफ्रिकेमधल्या कांगो देशाच्या किन्शासा राजधानीत आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसाचारात 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कांगोमधल्या विरोधी गटांनी दिली आहे, असं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
सरकारविरोधात प्रदर्शन करत असताना हा हिंसाचार उफाळून आला आहे. मात्र कांगो सरकारनं आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती दिली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. पोलीस आणि रिपब्लिकन गार्ड यांनी केलेल्या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती जोसेफ कबिला यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी गटांनी आंदोलन छेडले होतं. अनेक दिवसांपासून खदखदत असलेली ही मागणी न अडखळता विरोधकांनी थेट रस्त्यांवर उतरून केली होती. मात्र पोलिसांनी त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
2015मध्येही अशाच प्रकारच्या झालेल्या हिंसाचारात डझनांहून अधिक जण मृत्युमुखी पडले होते. इंटेरियर मंत्री इवारिस्ट बोशाब यांनी या आंदोलनाला उठावाची उपमा दिली आहे. या आंदोलनात 3 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. कांगोतल्या मुख्य विरोधी पक्षांनी राष्ट्रपती कबिला यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दबावतंत्र म्हणून हे आंदोलन केल्याची चर्चा आहे.