कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील धार्मिकस्थळी शक्तिशाली स्फोट होऊन या इमारतीचे छप्पर कोसळले असून, या दुर्घटनेत ५० जण ठार, तर ५५ जखमी झाले आहेत. मृतात लहान मुलेही आहेत. अलीकडच्या काळात घडलेला हा सर्वाधिक भीषण असा हल्ला आहे. प्रार्थनेसाठी लोक जमलेले असताना शिकारपूर जिल्ह्यातील लाखी दर येथील धार्मिकस्थळी हा स्फोट झाला आहे. रिमोटने हा स्फोट घडवून आणण्यात आला असून स्फोटाच्या तीव्रतेत बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीचे छप्पर कोसळले.अनेक लोक या छपराखाली गाडले गेले. छप्पर कोसळल्यामुळेच मृत्यूंची संख्या वाढली, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी अब्दुल्ला मेहर यांनी सांगितले. खाजगी प्रसारमाध्यमांनी हा आत्मघाती बॉम्बचा हल्ला असावा असे म्हटले आहे. या स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला.जिल्हा रुग्णालयातील डॉ. शकुर अली यांनी या स्फोटात ३३जण ठार झाल्याचे सांगितले. शिकारपूरचे पोलीस अधिकारी साकिब इस्माईल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढले जात असून त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे.स्फोट झालेल्या परिसरात गोंधळ असून अनेक जखमींना जवळपासच्या रुग्णालयात नेले असण्याचीही शक्यता आहे. या दुर्दैवी घटनेत ५० लोक मरण पावले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे असे स्थानिक प्रतिनिधी शहरयार मेहर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात वांशिक हिंसाचार वाढत असून, त्यातील हिंसाचाराचाच हा एक प्रकार आहे.
पाकमध्ये स्फोटात ५० ठार
By admin | Published: January 31, 2015 1:55 AM