पेशावर : अफगाणिस्तानच्या सीमेनजीक असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामधील कुर्राम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वाहनांमधील प्रवाशांवर गुरुवारी केलेल्या हल्ल्यात ५० जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत. वाहनांचा हा ताफा पराचिनार येथून पेशावरला जात असताना हा हल्ला झाला.
या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांमध्ये आठ महिला व पाच लहान मुले आहेत. मृतांमध्ये बहुतांश लोक शियापंथीय आहेत. २०० वाहनांचा ताफा पेशावरकडे जात असताना झालेल्या या हल्ल्याचा खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी तीव्र निषेध केला आहे.
घटनास्थळी भेट देऊन हल्ल्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करावा, असा आदेश त्यांनी या प्रांताच्या मुख्य सचिवांना दिला आहे. या प्रांतातील महामार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी एक विभाग स्थापन करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच मृतांच्या वारसदारांना व जखमी व्यक्तींना त्यांनी आर्थिक मदत जाहीर केली.
खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी म्हटले आहे की, निरपराध नागरिकांच्या करण्यात आलेल्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो. या हल्ल्यामागील सूत्रधारांना जेरबंद करून त्यांना कडक शिक्षा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महिनाभरात झालेले मोठे दहशतवादी हल्ले
मंगळवारी सैन्याच्या पोस्टववर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. त्यात १२ सैनिकांचा मृत्यू झाला होता, तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ६ दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आले होते.
पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तानात १६ नोव्हेंबर रोजी सैन्याच्या नाक्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यात पाकिस्तानचे ७ सैनिक ठार झाले होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
क्वेट्टा रेल्वे स्थानकावर ९ नोव्हेंबर रोजी भीषण आत्मघाती स्फोट घडविण्यात आला होता. त्यात २६ जण ठार झाले होते. त्यात १४ सैनिकांचाही समावेश होता. या हल्ल्याचीही जबाबदारी ‘बीएलए’ने घेतली होती.