इदलिब - यादवीने ग्रासलेल्या सीरियामध्ये तुर्कीने पुन्हा एकदा एक मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुमारे ५० पाकिस्तानीं लढवय्यांचा मृत्यू झाला. सीरियामध्ये बशर अल असद यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि त्यांच्याविरोधातील गट यांच्यात संघर्ष सुरू आहे. गेल्याच महिन्याच सीरियामधील सरकारविरोधात लढण्यासाठी तुर्कीने हजारो सैनिक पाठवले होते.
अरब न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार सीरियामध्ये सुरू असलेल्या लढाईत ५० हून अधिक पाकिस्तानी लढवय्ये मारले गेले आहेत. मात्र पाकिस्तानकडून कुठल्याही सरकारी सूत्रांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मारले गेलेले पाकिस्तानी लढवय्ये लीवा जैनबियून संघटनेशी संबंधित होते. या संघटनेमध्ये पाकिस्तानमधील शिया समर्थकांचा समावेश आहे. ही संघटना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने ऊभारली असून, त्यांच्याकडूनच त्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले जाते. इराण आणि सीरियामधील शिया समुदायाचे रक्षण करणे हा या संघटनेचा उद्देश आहे.
संबंधित बातम्या
तुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू
ISIS दहशतवाद्यांची 'मॅचमेकर' होती २५ वर्षीय तूबा, आता तिला ब्रिटनला घरी परतायचंय पण...
गुप्तचर यंत्रणेची डॅशिंग कामगिरी, 'मोसाद'ने 50 वर्षांपूर्वीचे घड्याळ शोधले
प्रसारमाध्यमांत येत असलेल्या वृत्तानुसार सध्या सीरियामध्ये सुमारे ८०० पाकिस्तानी लढवय्ये लढाई लढत आहेत. २०१५ पासून इदलिब शहरावर अनेक संघटनांचा कब्जा आहे. अल कायदा, हयात तहरीरी अल यांचा त्यात समावेस आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार इदलिब शहरात या दोन्ही संघटनांचे सुमारे १२ ते १५ हजार लढवय्ये उपस्थित आहेत. त्याशिवाय इस्लामिक स्टेटचे शेकडो दहशतवादीसुद्धा सरकारविरोधात लढाई लढत आहेत. दरम्यान, इदलिबमधील संघर्षानंतर लाखो लोकांनी घर सोडून पलायन केले आहे. तसेच सीरियामध्ये सुरू असलेल्या संघर्षात अनेक सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.