अंतराळात सर्वांत आधी भोजन करणारे अंतराळवीर होते पृथ्वीची तीन वेळा परिक्रमा करण्याचा विक्रम करणारे जॉन ग्लेन. १९६२ साली फ्रेंडशिप-७ मिशनमध्ये ते सहभागी होते. पाच तासांच्या अंतराळ वास्तव्यात त्यांनी भोजन केले होते. त्यांनी टूथपेस्टसारख्या ट्युबच्या साह्याने अॅपल प्युरी गिळली होती. अंतराळात अन्न गिळून पचवताही येते हे त्यामुळे सिद्ध झाले. अंतराळात भारहीनता असल्यामुळे अन्न खाता येईल की नाही, खाल्ले तर ते पचविता येईल का नाही, हा मोठा आव्हानात्मक प्रश्न होता.
(Image Credit : History.com)
१९६० च्या दशकाच्या मध्यात जेमिनी मिशनमध्ये दोघे अंतराळयात्रेवर गेले होते. त्यांना दररोज २५०० कॅलरी भोजन दिले जात होते. व्हर्लपूल या घरगुती सामान बनविणाऱ्या कंपनीने त्यांच्यासाठी प्लॅस्टिकबंद भोजन तयार केले होते. जेवण बनविल्यानंतर ते थंड करून अंतराळवीरांना दिले जात होते. अंतराळात साधे पाणी टाकून अन्न सामान्य तापमानावर आणून ते खाल्ले जात होते, तरीही अन्नाचा थंडपणा जात नव्हता.
(Image Credit : PEOPLE.com)
१९६५ साली जेमिनी-३ मिशनवर गेलेल्या जॉन यंग या वैज्ञानिकाने एक गडबड केली होती. ते अंतराळात एक बीफ सँडवीच लपवून घेऊन गेले होते. यंग हे १९७२ मध्ये अपोलो -१६ मिशनचे कमांडर बनून चंद्रावर पाऊल ठेवणारे नववे अंतराळवीर ठरले. त्यांनी गंमत म्हणून सोबत नेलेले सँडवीच अंतराळात मोठे आव्हान बनले. ब्रेडचे तुकडे अंतराळ यानाच्या सर्किटला धोका पोहोचवतील, अशी भीती होती. सुदैवाने तसे घडले नाही. अपोलो मिशनमध्ये अंतराळात व्यायाम करण्याजोगी जागा होती.
(Image Credit : Discover Magazine)
अंतराळवीरांना २८०० कॅलरीचे भोजन करण्याची मुभा होती. याआधीच्या तुलनेत स्वादिष्ट भोजन मिळत होते. थंड अन्न गरम करण्यासाठी दिल्या गेलेल्या बंदुकांमधून गरम पाणी निघत होते. त्यामुळे त्यांना गरम भोजन खाता येत होते. केवळ ट्युबमधून अन्न गिळण्याची विवशता राहिली नव्हती. अन्न चमच्यानेही खाता येत होते.