कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी सीमेत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या ५४ मच्छीमारांना अटक केली आहे. मच्छीमारांच्या वादग्रस्त प्रश्नावर चर्चा करण्यासाठी श्रीलंकेचे शिष्टमंडळ भारतात येण्याच्या आधी कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या नौदलाचा प्रवक्ता कमांडर इंडिका सिल्व्हा यांनी यासंदर्भात बोलताना दिलेल्या माहितीनुसार कांकेसंतुराई येथे २१ मच्छीमार व पाच बोटी जप्त करण्यात आल्या असून, इतर ३३ मच्छीमारांना तलाईमनार येथे अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या मच्छीमारांना विविध मच्छी निरीक्षण कार्यालयांत पुढील कारवाईसाठी आणण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका भेटीआधी श्रीलंकेने ८६ भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती. १९८७ नंतर मोदी हे श्रीलंकेला भेट देणारे पहिले भारतीय नेते होते. श्रीलंकेचे शिष्टमंडळ मच्छीमारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी या आठवड्यात भारतात येत आहे. परस्परांच्या सागरी सीमा ओलांडणे, एकमेकांच्या जलसीमेवर हल्ले करणे यासारखे मुद्दे या चर्चेत अंतर्भावित आहेत. श्रीलंकेची मच्छीमार संघटना व भारताची संघटना यात २४ व २५ मार्च रोजी चेन्नई येथे बैठक होत आहे. दोन्ही देशांच्या मच्छीमार संघटनांची बैठक तिसऱ्यांदा होत असून, त्यात पाक खाडी व किनारा येथील मासेमारीसंदर्भात तोडगा काढण्यावर चर्चा झाली आहे. अशी पहिली बैठक २७ जानेवारी २०१४ रोजी चेन्नई येथे झाली होती, तर दुसरी बैठक १२ मे २०१४ रोजी कोलंबो येथे झाली होती. श्रीलंकेच्या मच्छीमारांचे म्हणणे असे आहे की, भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसखोरी करतात व विनाशी पद्धतीने मच्छीमारी करतात, हे स्वीकारण्यासारखे नाही; पण भारतीय मच्छीमार व तामिळनाडू सरकारच्या मते कच्छातिवू बेटाचा परिसर व पाक खाडी ही परंपरागत मासेमारीची जागा असल्याने श्रीलंकेने ती विभागून वापरली पाहिजे. श्रीलंका भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांच्यात या मुद्यावर चर्चा झाली असून, हा प्रश्न मच्छीमारांच्या रोजीरोटीशी संबंधित असल्याने मानवी दृष्टिकोन ठेवून तो सोडवावा, असे ठरले आहे.
५४ मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात
By admin | Published: March 23, 2015 2:21 AM