पॅरिस : फ्रान्समधील गॅस कारखान्यात संशयित इस्लामिक दहशतवाद्याने कर्मचाऱ्याचा शिरच्छेद करून त्याचे डोके कारखान्याच्या प्रवेशद्वारावर लावले. ट्युनिशियातील पर्यटन स्थळावर झालेल्या हल्ल्यात अतिरेक्यांनी गोळीबार करून २८ जणांना ठार मारले आहे, तर कुवेतमध्ये मशिदीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला असून, त्यात २५ ठार झाले आहेत. इसिसने कुवेत हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, या तिन्ही हल्ल्यात ५४ जण ठार झाले.हल्लेखोराने ठार मारलेल्या माणसाचा शिरच्छेद केला असून, मृत व्यक्तीच्या कपाळावर अरेबिक भाषेत संदेश लिहून त्याचे शिर प्रवेशद्वारावर लावले आहे. हल्लेखोर ३५ वर्षाचा असून त्याचे नाव यासिन सलाही असे आहे. सुरक्षा सेवेतील लोकांना तो बऱ्याच दिवसांपासून माहीत होता; पण त्याचे गुन्हेगारी स्वरूप माहीत नव्हते. दरम्यान, फ्रान्समधील हल्ला हा इसिसने केल्याचा संशय आहे. या हल्ल्याची पद्धतही इसिसशी मिळतीजुळती आहे. (वृत्तसंस्था)