लिमा- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू शिष्टमंडळासह पेरु देशाच्या दौऱ्यावर आहेत. नायडू यांनी पेरुच्या विविध नेत्यांची भेट घेतली. पेरु आणि भारत यांच्या राजनयीक संबंधाना यंदा 55 वर्षे पूर्ण होत आहेत.नायडू यांनी या भेटीमध्ये पंतप्रधान सीजर विलियनुएवा बार्डालेस तसेच त्यांच्या चार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.या भेटीमध्ये भारत व पेरु या दोन्ही देशांनी जेनेरिक औषधे, माहीती आणि तंत्रज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, लष्करी साहित्य. अंतराळ मोहिमांमधील उपकरणे यांबाबत एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.पेरुचे परराष्ट्रमंत्री नेस्टर पोपोलिझिओ बार्डालेस म्हणाले, भारताला संयुक्त राष्ट्रामध्ये सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्त्व मिळाले पाहिजे. पेरुचा यासाठी भारताला पाठिंबा असेल. परराष्ट्रमंत्र्यांबरोबर पेरुचे आरोग्य मंत्री सिल्विया पेसाह एजाय आपले मत व्यक्त केले. भारतातील औषधनिर्माण क्षेत्र अत्यंत विकसित असून भारतातील फार्मा कंपन्यांनी पेरुमध्ये जेनेरिक औषधांच्या निर्माणासाठी कारखाने स्थापन करावेत असे त्यांनी आवाहन केले.
उपराष्ट्रपती पाच दिवसांच्या मध्य व दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 9 मे रोजी उपराष्ट्रपती पनामा येथे पोहोचले तेथे त्यांनी दोन परस्पर सामंजस्य करारांवर स्वाक्षऱी केली. तत्पुर्वी ते ग्वाटेमाला येथे गेले होते. तेथे विविध क्षेत्रांमध्ये विकास साधण्यासाठी परस्पर सामंजस्य करार करण्यात आला. पनामामध्ये त्यांनी भारतीय वंशाच्या समुदायाचीही भेट घेतली. या तिन्ही देशांचे भारताशी असणारे संबंध वृद्धींगत व्हावे या त्यांच्या दौऱ्यामागचा उद्देश आहे.