बैरुत : अमेरिकाप्रणीत फौजांनी सिरियातील इसिसविरोधी मोहिमेदरम्यान केलेल्या हवाई हल्ल्यांत ५५३ जिहादी व ३२ सामान्य नागरिक ठार झाले, अशी माहिती हिंसाचारावर निगराणी ठेवणाऱ्या संघटनेने गुरुवारी दिली. ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार निगराणी संघटनेने या हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ४६४ जण हे इस्लामिक स्टेट अर्थात इसिसचे दहशतवादी असल्याचे सांगितले. याशिवाय या हल्ल्यांमध्ये अल-काइदाशी संलग्न नुसरा फ्रन्टचे ५७ सदस्य मारले गेले आहेत. मृतांत पाच महिला आणि सहा मुलांचा समावेश आहे. अमेरिका इसिसविरुद्ध जुलै महिन्यापासून इराकमध्ये तर अरब सहकाऱ्यांच्या मदतीने सप्टेंबरपासून सिरियात हल्ले करत आहे. ब्रिटन आणि फ्रान्सही इराकमध्ये इसिसला लक्ष्य करत आहेत. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र घोषणापत्राच्या कलम ५१ नुसार सिरियातील आपल्या कारवाईचे समर्थन केले आहे. या कलमानुसार, प्रत्येकास किंवा समूहाला सशस्त्र हल्ल्याविरुद्ध स्वसंरक्षणाचा हक्क आहे. हवाई हल्ल्यांत सामान्य नागरिकांच्या जीवित व वित्तहानीची वृत्त अमेरिकेने गांभीर्याने घेतले असून, याची चौकशी सुरू आहे, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कर्नल पॅट्रिक रायडर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
अमेरिकेच्या हल्ल्यात ५५३ जिहादी ठार
By admin | Published: October 24, 2014 3:28 AM