जकार्ता : इंडोनेशियाच्या जावा बेटाला सोमवारी भूकंपाचा ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला, यात किमान १६२ जण ठार झाले, ७०० हून अधिक जखमी झाले तर डझनभर इमारतींचे नुकसान झाले. रहिवासी सुरक्षिततेसाठी राजधानीच्या रस्त्यावर उतरले होते. पडलेल्या इमारतींखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात य़ेत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात दहा किलोमीटर खोलीवर होता, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने दिली.
सियांजूर प्रादेशिक रुग्णालयात ५६ मृतदेह आणि सुमारे ७०० जखमींना आणण्यात आले आहे. कोसळलेल्या इमारतींमुळे अनेकांना दुखापत झाली, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण एजन्सीचे प्रमुख सुहार्यंतो यांनी सांगितले. यातील २० जणांचा मृत्यू रुग्णालयात झाला. सियांजूरच्या आसपास अनेक भूस्खलनाची नोंद झाली आहे. इस्लामिक बोर्डिंग स्कूल, रुग्णालये व इतर सार्वजनिक सुविधांसह अनेक इमारतींचे नुकसान झाले.
इंडोनेशियात आलेले मोठे भूकंप- फेब्रुवारीमध्ये, पश्चिम सुमात्रा प्रांतात ६.२ तीव्रतेच्या भूकंपात किमान २५ जण ठार झाले होते, तर ४६० हून अधिक जखमी झाले होते. - जानेवारी २०२१ मध्ये, पश्चिम सुलावेसी प्रांतात - ६.२ तीव्रतेच्या भूकंपात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ६,५०० लोक जखमी झाले.- २००४ मध्ये हिंदी महासागरातील भूकंप आणि सुनामीने डझनभर देशांमध्ये सुमारे दोन लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक इंडोनेशियातील होते.