अमेरिकेच्या विमानतळांवर आजपासून ५जी इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे. यामुळे जगभरातील विमान वाहतूक कंपन्यांनी धसका घेतला असून एअर इंडियाने देखील अनेक विमानोड्डाणे रद्द केली आहेत, तर काहींची वेळ बदलली आहे. एअर इंडियाशिवाय इमिरेट्स, ऑल निप्पॉन एअरवेज, जपान एअरलाईनने देखील चिंता व्यक्त करताना फ्लाईट रद्द केल्या आहेत. (5G internet deployment in US Airports.)
अमेरिकेत नवीन C band 5जी सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे अनेक विमाने खराब होण्याची शक्यता आहे. अमेरिकी विमानोड्डाण प्रशासनाने आधीच विमान कंपन्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. नव्या ५जी सेवेमुळे विमानांचा रेडिओ अल्टीमीटर इंजिन, ब्रेकिंग सिस्टिमवर परिणाम होऊ शकतो, यामुळे विमाने लँडिंग मोडमध्ये न जाणे किंवा रनवेवर विमान न थांबणे आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असे म्हटले होते.
यामुळे एफएएकडे चिंतादेखील व्यक्त करण्यात आली आहे. हे पत्र अमेरिकेच्या एअरलाईन्स ग्रुपने लिहिले आहे. ५जीमुळे भयंकर विमान संकट उत्पन्न होण्याचा धोका व्यक्त करण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये United Airlines, American Airlines, Delta Airlines आणि FedEx या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या यूनाइटेड एअरलाइन्स आणि अमेरिकन एअरलाइन्स भारतात ये-जा करतात.
एअरलाइन्स ग्रुपचे म्हणणे आहे की 5G संपूर्ण यूएस मध्ये कुठेही लागू केले जाऊ शकते. परंतु विमानतळाच्या धावपट्टीपासून 2 मैल दूरपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ नये.एअर इंडियाने याबाबत ट्विट केले होते की, अमेरिकेत 5G लागू झाल्यामुळे अमेरिकेतील उड्डाणांवर परिणाम होणार आहे. उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही फ्लाइट्सच्या वेळेतही बदल करण्यात आला असून त्यामध्ये विमानांमध्येही बदल करण्यात येणार आहेत.