अमेरिकेच्य़ा विमानतळांवर बुधावारपासून ५जी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. ५जी सेवा धोकादायक असल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे. याच्या वेव्हचा विमानांच्या यंत्रणेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. यामुळे जगभरातील अनेक विमान कंपन्यांनी अमेरिकेकडे जाणारी विमानोड्डाणे रद्द केली आहेत. एअरइंडियाने देखील काल दिवसभरात १४ विमाने रद्द केली आहेत. एअर इंडियाशिवाय इमिरेट्स, ऑल निप्पॉन एअरवेज, जपान एअरलाईनने देखील चिंता व्यक्त करताना फ्लाईट रद्द केल्या आहेत. (5G internet deployment in US Airports.)
यूएस एव्हिएशन रेग्युलेटर फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने 14 जानेवारी रोजी सांगितले की "विमानाच्या रेडिओ अल्टिमीटरमध्ये 5G हस्तक्षेपामुळे इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टमला लँडिंग मोडमध्ये जाण्यापासून रोखले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे विमानाला धावपट्टीवर थांबणे अशक्य होऊ शकते." उंचीमापक जमिनीपासून विमानाची उंची मोजतो. अल्टिमीटर ज्या बँडवर काम करतो तो आणि 5G सिस्टीम ज्या बँडवर काम करते ती जवळपास एकसारखीच आहे. यामुळे 5G सेवा विमानांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एअर इंडियाने ट्विटरवर म्हटले आहे की "अमेरिकेत 5G चालू केल्याने आठ भारत-यूएस उड्डाणे रद्द केली जात आहेत. एअर इंडियाची आठ उड्डाणे आहेत. दिल्ली-न्यूयॉर्क, न्यूयॉर्क-दिल्ली, दिल्ली-शिकागो, शिकागो-दिल्ली, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली, दिल्ली-नेवार्क आणि नेवार्क-दिल्ली अशी विमाने आहेत. गुरुवारी ऑपरेट होणारी एकूण सहा इंडो-यूएस उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
एफएएकडे चिंतादेखील व्यक्त करण्यात आली आहे. हे पत्र अमेरिकेच्या एअरलाईन्स ग्रुपने लिहिले आहे. ५जीमुळे भयंकर विमान संकट उत्पन्न होण्याचा धोका व्यक्त करण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये United Airlines, American Airlines, Delta Airlines आणि FedEx या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या यूनाइटेड एअरलाइन्स आणि अमेरिकन एअरलाइन्स भारतात ये-जा करतात. एअरलाइन्स ग्रुपचे म्हणणे आहे की 5G संपूर्ण यूएस मध्ये कुठेही लागू केले जाऊ शकते. परंतु विमानतळाच्या धावपट्टीपासून 2 मैल दूरपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ नये.